Sunday 1 December 2013

एक स्थानबद्ध आनंदी कैदी मी...

मला जाणीव आहे, मला पुष्कळ काही करायचे आहे, बऱ्याच काही गोष्टींकडे लक्ष पुरवायचे आहे. कपडे धुवायचे बाकी आहेत, ओटा साफ करायचा आहे, केर काढायचा राहून गेला आहे आणि कपबश्या पण विसळायच्या आहेत. पण खरोखरच मी हे सारे तडकाफडकी करायला घेऊ शकत नाही., कारण तुम्ही पाहताच आहात की माझा बोका माझ्या मांडीवर बसला आहे. तो शरीर ताणतो, कूस बदलतो आणि माझ्याकडे हळूच तिरप्या नजरेने पाहतो. त्याच्या झोपाळलेल्या सोनेरी डोळ्यांची हलकेच उघडझाप करतो. मी त्याच्या लांबलचक शेपटीचे केस छान लावते आणि मायेने त्याच्या पोटाला हळूच गुदगुल्या करते. तो एक मोठी जांभई देतो आणि लडिवाळपणे गुरगुरून सारे काही आवडल्याची पोच देतो. फोन वाजतो, दारावर थाप पडते, पण मी हलूच शकत नाही कारण माझा बोका माझ्या मांडीवर आहे. छानसा ऊन्हाचा कवडसा आला आहे, जणू काही माझ्या ह्या मित्राला थोडी अजून उब द्यायला. एक स्थानबद्ध आनंदी कैदी आहे मी... काही क्षण स्तब्धतेचे, निर्विकल्प. मला वाटते की मी एक छोटीशी डुलकी घेईन, ह्या मऊमऊ लोकरीच्या गोळ्या सोबत, मांडीवर असलेल्या माझ्या बोक्या सोबत. मूळ कविता - श्रीमती करेन बॉक्सेल. (स्वैर अनुवादित)

No comments:

Post a Comment