Tuesday 14 February 2012

चिंतातुर जंतू



"निजले जग; का आता इतक्या तारा खिळल्या गगनाला |
काय म्हणावे त्या देवाला – "वर जाउनि म्हण जा त्याला" || १ ||

"तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या |
उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" || २ ||

"हिरवी पाने उगाच केली झाडांवर इतकी का ही |
मातित त्यांचे काय होतसे?" "मातिस मिळुनी जा पाहीं!" || ३ ||

"पुराबरोबर फुकटावारी पाणी हे वाहुनि जात |
काय करावे जीव तळमळे" "उडी टाक त्या पूरात" || ४ ||

"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी जास्त" || ५ ||

देवा, तो विश्वसंसार राहू द्या राहिला तरी |
ह्या चिंतातुर जंतूंना एकदा मुक्ति द्या परी ! || ६ ||


- गोविन्दाग्रज (कवि रा. ग. गडकरी).

No comments:

Post a Comment