Friday 25 March 2011

नाही पाहेली पुनिव


आमी जलमलो मातीत
किती होनार गा माती,
खापराच्या दिव्यात
या कधी पेटनार वाती.

किती घरातून सूर्य
जातं होऊन फिरते,
पिठासारख्या उजिळ
घरभर पसरते.
काया म्हसीवानी रात
नित आमच्या दारात,
निर्‍हा अंधार भरली,
बसे पखाल रिचोत.
नाही पाहेली पुनिव,
लय आईकल्या गोठी,
आमी जलमलो ....

फास लावून जल्लद,
चाले कोनाचा वखर,
खाली ढेकलाच्या वानी,
आमी होतो चुरचूर.
फुलवल्या कापसाले
चंद्र चोरू चोरू पाहे,
तरी माय मावलीची
मांडी उघळीच राहे.
ऊभं अभाय फाटलं,
कसी झाकनार छाती,
आमी जलमलो ....

दाने भरता कन्सात
येती हुशार पाखरं,
भर हंगामात अशा
होते पारखी भाकर.
तहा पोटातली आग
पेट घेते आंगभर,
मंग सोंगेल फनाची
अनी होते धारदार.

कोनं सांगाव रगत
तिले लागनार किती,
खापराच्या दिव्यातून
मंग पेटतील वाती,
आमी जलमलो ....

- कवि विठ्ठल वाघ (काया मातीत मातीत).